लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : पंतप्रधान महाआवास याेजना व गवंडी प्रशिक्षण याेजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात करवाही (ता. रामटेक) येथे सहा घरकुलांना मंजुरी देण्यात आली हाेती. या सहाही लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुलांचे बांधकाम नियाेजित काळात पूर्ण केले. त्यामुळे त्यांचा रामटेक पंचायत समिती कार्यालयात चावी, प्रमाणपत्र, दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन गाैरव करण्यात आला.
या सहा लाभार्थ्यांमध्ये राजेंद्र टिकापाचे, छत्रीदास टिकापाचे, मुनींद्र टिकापाचे, राधेश्याम बोरीकर, परदेशी वरठी, ज्ञानेश्वर टिकापाचे यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या मदतीने त्यांच्या घरकुलांचे बांधकाम याेग्य पद्धतीने पूर्ण केले. त्यामुळे या लाभार्थ्यांचा रामटेक पंचायत समिती कार्यालयात आभासी पद्धतीने गृहप्रवेशही करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, करवाहीच्या सरपंच सीमा कोकोडे, उपसरपंच दीपक टिकापाचे, विस्तार अधिकारी प्रभाकर चन्ने, सागर वानखेडे, अभियंता मयूर कोल्हे, शाहु, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाडगे उपस्थित हाेते. घरकूल बांधकामाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याने करवाही ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले. संचालन सागर वानखडे यांनी केले. प्रदीप बमनोटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. प्रभाकर चन्ने यांनी आभार मानले.