लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरपोच मिळणाऱ्या गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमाचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे सर्रास टाळतात. याबाबत ग्राहकदेखील जागरूक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळत असल्याचा फटका बसत आहे. विनातपासणी केलेला एखादा धोकादायक सिलिंडर घरी आल्यास त्यातून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर वजन करूनच घ्यावे, असे आवाहन ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केले.कंपन्यांच्या परिपत्रकाची अवहेलनाभारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तिन्ही तीनही प्रमुख कंपन्यांच्या डीलर्सतर्फे सिलिंडर घरपोच देताना त्याची संपूर्ण तपासणी आणि वजन करण्याची जबाबदारी ग्राहकांची आहे. बºयाचदा डिलिव्हरी करणाऱ्यांकडे वजन करण्याचे मशीन उपलब्ध नसल्याचे दिसते. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळतात, असे पाहणीत आढळून आले आहे. सिलिंडरची तपासणी आणि वजन करून देण्याचे परिपत्रक कंपन्यांनी काढले आहे. नियमाचे पालन करण्याच्या सूचना प्रत्येक डीलर्सला देण्यात आल्या आहेत. पण कंपन्यांच्या सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.डिलिव्हरी बॉय मागतो जास्त पैसेनोव्हेंबरमध्ये घरगुती विनाअनुदानित सिलिंडरचे दर ७२३.५९ रुपये आहेत. पण डिलिव्हरी बॉय घरपोच देताना जास्त पैसे अर्थात तब्बल ७५० रुपये मागतो. आम्हाला डीलर्स घरी सिलिंडर पोहोचविण्याचे पैसे देत नाही, अशी सबब सांगून ते किमतीपेक्षा जास्त पैसे वसूल करीत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रारीनंतरही डीलर्स अशा डिलिव्हरी बॉयला पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे.नियमांचे पालन व्हावेवैधमापन शास्त्र अधिनियम २००९ अंतर्गत ग्राहकांना सिलिंडर देताना वजन करून देणे बंधनकारक आहे. सिलिंडरवर उल्लेख केलेले वजन १०० ग्रॅम कमी भरले तरी तो सिलिंडर परत करण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरमध्ये निव्वळ गॅसचे वजन १४.२ किलो असणे आवश्यक आहे. याबाबत कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते.ग्राहकांची जबाबदारी महत्त्वाचीघरी गॅस सिलिंडर आल्यानंतर त्याची तपासणी आणि वजन करण्याची सक्ती ग्राहकांनी करणे, ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र अनेकांना याबाबत माहितीच नाही. अशा प्रकारची तपासणी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याचे ग्राहकांना माहिती नसल्यामुळे त्यांच्याद्वारे सक्ती केली जात नाही. परिणामत: कमी वजनाचे, लिकेज असलेले सिलिंडर त्यांना वापरावे लागते. याबाबत ग्राहकांनी जागरूक असायला हवे आणि सिलिंडर वजन करूनच घ्यावे.वैधमापन शास्त्र विभागातर्फे तपासणी नाहीचवैधमापन शास्त्र नागपूर विभागाकडे आतापर्यंत किती घरगुती सिलिंडरच्या वजनाची तपासणी केली, याचा डाटा उपलब्ध नाही. अर्थात या विभागाचे अधिकारी तपासणी करीतच नसल्याचे दिसून येते. दर महिन्याला घरगुती सिलिंडरचे वजन आणि पेट्रोल पंपावरील मापाची आकस्मिक तपासणी करणे विभागाला बंधनकारक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे.ग्राहकच करीत नाहीत सिलिंडरचे वजनघरगुती सिलिंडरची तपासणी आणि वजन करून घेण्याचे अधिकार ग्राहकांना माहीत नाही. त्यामुळे त्यांची फसवणूक होते. कमी वजनाचे आणि लिकेज असलेले सिलिंडर त्यांना वापरावे लागते. ग्राहकांनी याबाबत जागरूक असावे.गजानन पांडे, विदर्भ प्रांत संघटनमंत्री,अखिल भारतीय ग्राहक संघटना.