नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारकर्त्याच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्सला जोरदार चपराक बसली.
तक्रारकर्त्याला उर्वरित ३ लाख ५० हजार रुपये स्वीकारून दोन भूखंडांचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून द्या व भूखंडांचा प्रत्यक्ष ताबा द्या किंवा काही तांत्रिक कारणांमुळे विक्रीपत्र करणे अशक्य असल्यास तक्रारकर्त्याकडून घेतलेले ३ लाख ५० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असे आदेश आयोगाने न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपरला दिले. तसेच, तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कम डेव्हलपरनेच द्यायची आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
डॉ. सूर्यभान सातपुते असे तक्रारकर्त्यांचे नाव असून ते वडधामना, ता. हिंगणा येथील रहिवासी आहेत. तक्रारीतील माहितीनुसार, सातपुते यांनी न्यू संस्कृती लॅण्ड डेव्हलपरच्या मौजा व्याहाड येथील ले-आऊटमधील दोन भूखंड सात लाख रुपयांत खरेदी करण्यासाठी ३१ जुलै २०१५ रोजी करार केला. तसेच, त्याच दिवशी डेव्हलपरला धनादेशाद्वारे ३ लाख ५० हजार रुपये अदा केले. त्यानंतर डेव्हलपरने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सातपुते यांना भूखंडांचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून दिले नाही. तसेच, सातपुते यांची रक्कमही परत केली नाही. परिणामी, सातपुते यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्यानंतर डेव्हलपरने आयोगाची नोटीस तामील होऊनही स्वत:ची बाजू मांडण्यासाठी हजेरी लावली नाही. करिता, आयोगाने तक्रारीवर एकतर्फी कारवाई करून रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर हा निर्णय दिला.