नागपूर : पीडित ग्राहकाचे दोन लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने साई पर्थ इन्फ्रा बिल्डर्स ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्सला दिला आहे.
व्याज ९ जुलै २०१९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. याशिवाय ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रार खर्चापोटी १५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कमही इन्फ्रानेच द्यायची आहे. आयोगाचे अध्यक्ष अतुल आळसी, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे इन्फ्राला जोरदार दणका बसला आहे.
रवींद्र भुरे, असे पीडित ग्राहकाचे नाव असून ते एसआरपीएफ कॅम्प, हिंगणा रोड येथील रहिवासी आहेत. त्यांनी इन्फ्राच्या वेळाहरी येथील ले-आऊटमधील एक भूखंड ८ लाख ४० हजार रुपयात खरेदी केला होता व त्यापैकी ५ लाख १५ हजार रुपये अदा केले होते. त्यानंतर इन्फ्राने करार रद्द करून त्यांना ३ लाख १५ हजार रुपयेच परत केले. दोन लाख रुपये दिले नाही. करिता, भुरे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.