लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका वकील ग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर करून योगदा कन्स्ट्रक्शन अॅन्ड असोसिएटस्, असोसिएटस्चे भागीदार सुनील जोत व जमीन मालक विवेक वैद्य या प्रतिवादींना दणका दिला.येत्या सहा महिन्यांमध्ये रखडलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे, ग्राहकाला सदनिकेचा ताबा देण्यात यावा व सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करून देण्यात यावे असे आदेश प्रतिवादींना देण्यात आले आहेत. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५ लाख व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. विक्रीपत्र नोंदवण्याच्या वेळी सदनिकेची उर्वरित रक्कम प्रतिवादींना अदा करण्यात यावी असे ग्राहकाला सांगण्यात आले आहे. खंडपीठाचे पीठासीन सदस्य बी. ए. शेख व सदस्य जयश्री येंगल यांनी हा निर्णय दिला.मनोज साबळे असे ग्राहकाचे नाव आहे. तक्रारीतील माहितीनुसार, साबळे यांनी प्रतिवादींच्या हितेश्री कृष्णा मंगल आर्केड या बहुमजली इमारतीमधील एक सदनिका ५२ लाख रुपयांत खरेदी करण्याचा करार केला आहे. करारानुसार, साबळे यांनी प्रतिवादींना आतापर्यंत २६ लाख रुपये दिले आहेत. परंतु, प्रतिवादींमधील वादामुळे इमारतीचे तिसऱ्या माळ्यानंतरचे बांधकाम रखडले असल्याने साबळे यांनी पुढील रक्कम थांबवून ठेवली. तसेच, ११ जानेवारी २०१६ रोजी प्रतिवादींना कायदेशीर नोटीस बजावून इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली. त्याचा काहीच फायदा झाला नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १७ अंतर्गत तक्रार आयोगात तक्रार दाखल केली होती.
योगदा कन्स्ट्रक्शनला ग्राहक आयोगाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 11:59 PM
महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने एका वकील ग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर करून योगदा कन्स्ट्रक्शन अॅन्ड असोसिएटस्, असोसिएटस्चे भागीदार सुनील जोत व जमीन मालक विवेक वैद्य या प्रतिवादींना दणका दिला.
ठळक मुद्देग्राहकाची तक्रार अंशत: मंजूर : ५.१० लाख रुपये भरपाई दिली