लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका अवमानना प्रकरणामध्ये एम्परर होंडा शोरूमचे संचालक अविनाश भुते, सुनीता भुते, अंबर भुते व दिनेश आचार्य यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावून या सर्वांना येत्या २७ मार्च रोजी हजर होण्याचा आदेश दिला.प्रकरणावर मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या चौघांविरुद्ध राम प्रभाकर करू यांनी अवमानना अर्ज दाखल केला आहे. करू यांनी एम्परर होंडा शोरूममधून १२ लाख ३८ हजार रुपयांत होंडा सिटी कार खरेदी केली होती. त्या कारला जुने पार्टस् लावण्यात आले असल्याचे खरेदीच्या काही दिवसानंतर त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शोरुमकडे तक्रार करून नवीन कार देण्याची मागणी केली. परंतु, त्यांची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. २१ सप्टेंबर २०१८ रोजी मंचने ती तक्रार अंशत: मंजूर करून करू यांना नवीन कार देण्यात यावी किंवा कारचे १२ लाख ३८ हजार रुपये ९ टक्के व्याजाने परत करण्यात यावे असे आदेश शोरुम संचालकांना दिले. तसेच, करू यांना शारीरिक-मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी ४० हजार रुपये भरपाई मंजूर केली. या आदेशाचे पालन करण्यासाठी शोरुम संचालकांना ३० दिवसाचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर करू यांनी संचालकांना मंचच्या निर्णयाची प्रत पाठविली व मंचच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली. परंतु, त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही. परिणामी, त्यांनी मंचमध्ये अवमानना अर्ज दाखल केला आहे. करू यांच्यातर्फे अॅड. श्रीकांत सावजी यांनी बाजू मांडली.समन्सला प्रतिसाद नाहीयापूर्वी या चौघांना समन्स बजावून २८ फेबु्रवारी रोजी मंचासमक्ष प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सोनेगाव पोलिसांनी त्यांना समन्स तामील केला. त्यानंतरही ते मंचासमक्ष हजर झाले नाही. परिणामी, त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आला आहे. यानंतरही मंचासमक्ष हजर होणे टाळल्यास त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट बजावला जाऊ शकतो. तसे झाल्यास त्यांना अटक करून मंचासमक्ष हजर केले जाईल.
ग्राहक मंच : अविनाश भुते यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 8:42 PM
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका अवमानना प्रकरणामध्ये एम्परर होंडा शोरूमचे संचालक अविनाश भुते, सुनीता भुते, अंबर भुते व दिनेश आचार्य यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावून या सर्वांना येत्या २७ मार्च रोजी हजर होण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्दे२७ मार्च रोजी हजर होण्याचे आदेश