लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला ट्रकच्या विम्याचे १३ लाख ५० हजार रुपये १० टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला एका प्रकरणात दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ६० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमदेखील कंपनीने द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. १३ लाख ५० हजार रुपयावर १६ मार्च २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला ३० दिवसाचा वेळ देण्यात आला. विकास शरजमानी असे ग्राहकाचे नाव असून ते जरीपटका येथील रहिवासी आहेत.मंचमधील तक्रारीतील माहितीनुसार, शरजमानी यांनी ट्रक खरेदी करण्यासाठी सुंदरम फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्या ट्रकचा न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून १३ लाख ५० हजार रुपयाचा विमा काढण्यात आला होता. विम्याचा कालावधी १९ जानेवारी २०१६ ते १८ जानेवारी २०१७ पर्यंत होता. संबंधित ट्रक १६ एप्रिल २०१६ रोजी चोरीला गेला. १८ एप्रिल २०१६ रोजी त्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडे विमा दावा दाखल करण्यात आला. तो दावा फेटाळण्यात आला. त्यामुळे शरजमानी यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने नोटीस बजावल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून तक्रारीतील आरोप फेटाळून लावले व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.निर्णयातील निरीक्षणउपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता ट्रकची चोरी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर करणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने विविध कारणांनी विमा दावा नाकारला. त्या निर्णयात तथ्य दिसून येत नाही. तसेच, कंपनीने सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याचे विविध बाबींवरून स्पष्ट होते. परिणामी, तक्रारकर्ता विम्याची रक्कम व भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.