लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दणका बसला. पीडित ग्राहकांचे ७१ हजार ३८ रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि त्यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई अदा करावी, असे आदेश कंपनीला देण्यात आले. व्याज २० जून २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला.कंपनीविरुद्ध कैलाश सतीजानी व ओमप्रकाश हरिरमानी यांनी तक्रार दाखल केली होती. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून हे आदेश दिले. तक्रारकर्त्यांसह एकूण १५ जणांच्या समूहाने २४ ते २६ जून २०१७ पर्यंत मध्य प्रदेशातील पचमढी येथे सहलीला जाण्याची योजना आखली होती. त्यांनी मेक माय ट्रिप इंडिया कंपनीमार्फत वनस्थली हॉटेलमध्ये पाच वातानुकूलित खोल्या सकाळच्या न्याहारीसह आरक्षित केल्या होत्या. त्याकरिता कंपनीला ऑनलाईन पद्धतीने ७१ हजार ३८ रुपये अदा केले होते. परंतु, २३ जून २०१७ रोजी हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर त्यांच्या नावाने बुकिंग झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आठ तासाचा प्रवास केल्यानंतर महिला व मुलाबाळांसह सर्वांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, मागे परत जाऊन पिपरिया येथील हॉटेलमध्ये रात्र काढावी लागली. कंपनीने दुसऱ्या दिवशीही त्यांना हॉटेल दिले नाही व पैसेही परत केले नाही. परिणामी, तक्रारकर्त्यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून तक्रारीतील सर्व आरोप फेटाळले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. शेवटी मंचने हा निर्णय दिला.
ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:43 AM
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दणका बसला.
ठळक मुद्देग्राहकांच्या हिताचे विविध आदेश जारी