लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्याचे ७० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने पवनसूत रियल इस्टेट अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्सला दिला आहे. व्याज २० जून २०१३ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे.याशिवाय तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कमदेखील डेव्हलपरने द्यायची आहे. या आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तानाजी हेडाऊ असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते प्रकाशनगर येथील रहिवासी आहेत. मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून हे आदेश दिले.तक्रारीतील माहितीनुसार, हेडाऊ यांनी पवनसूत डेव्हलपरच्या मौजा फुकेश्वर, ता. उमरेड येथील ले-आऊटमधील एक भूखंड ७० हजार रुपयात खरेदी करण्याचा करार केला होता. त्यानंतर त्यांनी डेव्हलपरला वेळोवेळी आवश्यक रक्कम दिली. दरम्यान, डेव्हलपरने भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्याकरिता टाळाटाळ केली. त्यामुळे हेडाऊ यांनी चौकशी केली असता संबंधित जमीन डेव्हलपरच्या नावावर नसल्याचे कळले व डेव्हलपरने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. परिणामी, हेडाऊ यांनी डेव्हलपरविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तसेच, डेव्हलपरला दिलेले ७० हजार रुपये व्याजासह परत मिळविण्यासाठी मंचमध्ये धाव घेतली होती. तक्रारीवरील प्राथमिक सुनावणीनंतर मंचने डेव्हलपरला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. परंतु, डेव्हलपर मंचसमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे मंचने तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही केली व रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता वरीलप्रमाणे आदेश जारी केले.सेवेत अक्षम्य निष्काळजीपणाडेव्हलपरने ग्राहकास द्यावयाच्या सेवेत अक्षम्य निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते. बांधकाम व्यावसायिकाने संबंधित विभागाकडून परवानगी मिळण्याआधी ग्राहकांना प्रलोभन दाखवून व्यवहार करणे व त्यांच्याकडून पैसे घेणे म्हणजे अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब होय. डेव्हलपरने अशीच कृती करून ग्राहकाची फसवणूक केली आहे. त्यामुळे ग्राहक दिलासा मिळण्यास पात्र आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आहे.
ग्राहक मंच : तक्रारकर्त्याचे ७० हजार रुपये १८ टक्के व्याजाने परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 8:40 PM
तक्रारकर्त्याचे ७० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने पवनसूत रियल इस्टेट अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्सला दिला आहे.
ठळक मुद्देपवनसूत रियल इस्टेट अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्सला आदेश