रामटेक : ग्राहकाने ऑनलाईन खरेदी करीत माेबाईल हॅण्डसेट मागवला आणि कंपनीला रक्कमही अदा केली. मात्र, त्या कंपनीने रक्कम घेऊनही माेबाईल पाठविला नाही. फसवणुकीचा हा प्रकार रामटेक शहरात नुकताच घडला.
उद्धव बालाजी हटवार (४८, रा. राजाजी वाॅर्ड, रामटेक) यांना नवीन माेबाईल हॅण्डसेट खरेदी करावयाचा हाेता. त्यामुळे त्यांनी क्रेजी डील डाॅट काॅम या संकेतस्थळावर रिअल मी नारजाे-१० हा माेबाईल बुक केला आणि त्याचे ११,९९९ रुपयांचे बिल कंपनीला फाेन पेद्वारे अदा केले. पण कंपनीने त्यांना सात महिने होऊनही माेबाईल पाठविला नाही. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भा.दं.वि. ४२० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार मनाेहर राऊत करीत आहेत.