लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्चनंतर थेट जून महिन्यात वाटण्यात येत असलेल्या वीज बिलामुळे नागरिक चक्रावले आहेत. अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक बिल आल्यामुळे बहुतांश नागरिक महावितरण कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. दररोज ५०० वर लोक तक्रार घेऊन कार्यालयात पोहोचत आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण आतापर्यंत केवळ अर्ध्या शहरातच बिल वितरित झालेले आहे.मिसाळ ले-आऊट येथील रहिवासी भीमराव कोटांगळे यांनी गेल्या दोन महिन्यात सरासरी बिल भरले, तरी त्यांना ६,५६० रुपये बिल आले. श्यामनगर, हुडकेश्वर येथील प्रीती शिरीष बोडखे यांच्या नावावरील वीज बिल सलग भरले जात आहे. परंतु त्यांना ९०३ युनिटचे ६,७७० रुपयाचे बिल आले. गोपालनगरातील माटे परिवाराचीही अशीच व्यथा आहे. त्यांच्या घरी चार मीटर आहेत. एक लाखापेक्षा अधिकचे बिल आले. कुटुंब आश्चर्यचकित आहे. हे सर्वजण हे मानायलाच तयार नाही की, त्यांनी इतक्या अधिक विजेचा वापर केला आहे. मिलिंद लोहकरे यांचेही असेच म्हणणे आहे. दर महिन्याला बिल भरल्यानंतरही त्यांना ७,४९० रुपयाचे बिल आले. महावितरणच्या कार्यालयात गेल्यावर समजले की, बिलात गडबड आहे.त्यात ऑनलाईन पेमेंटचा उल्लेखच केलेला नाही. बिल भरल्याची पावती दाखवल्यावर ३ हजार रुपये कमी करण्यात आले. परंतु सर्वांसोबतच असे होत नाही आहे. सोमवारी तुळशीबाग कार्यालयात जवळपास ५०० लोकांचा मोर्चा धडकला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकेका ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.काहीजण संतुष्ट झाले तर काहींच्या समस्या अजूनही कायम आहेत. शहरातील इतर कार्यालयातही अशीच गर्दी होत आहे. दररोज ५०० वर तक्रारी येत आहेत. भविष्यात या तक्रारींची संख्या वाढेल कारण आतापर्यंत अर्ध्या ग्राहकांनाच वीज बिल मिळालेले आहेत.
सरासरीचा खेळमहावितरण सूत्रानुसार सरासरी बिल देताना डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीच्या बिलाचा आधार घेण्यात आला होता. तेव्हा विजेची मागणी कमी होती. आताचे बिल हे मार्च, एप्रिल व मे महिन्यातील येत आहेत. या दरम्यान विजेचा उपयोग अधिक होतो. याचा थेट परिणाम वीज बिलांवर पडत आहे. महावितरणच्या अभियंत्यांनी सरासरी बिल जास्तीत जास्त वापरानुसार पाठवण्याचे आवाहन केले होते. परंतु तसे झाले नाही.
बिल किस्तप्रमाणे भरण्याची सवलत द्यावीमहावितरणच्या कार्यालयात येत असलेल्या नागरिकांना कर्मचारी बिलातील एकेक गोष्ट समजावून सांगत आहे. लोक समजतही आहेत. परंतु बहुतांश नागरिकांचे म्हणणे आहे की, तीन महिन्याचे बिल एकाच वेळी भरणे कठीण आहे. त्यामुळे बिल किस्तप्रमाणे भरण्याची सवलत देण्यात यावी. परंतु यासंदर्भात आतापर्यंत कुठलेही धोरण ठरलेले नाही. महावितरणचे कर्मचारीही लोकांना कुठलेही ठोस आश्वासन देत नाहीत.