लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला असून ऑक्सिजन सिलिंडरसह विविध उपकरणे व सुविधांची कमतरता जाणवत आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सर्व रुग्णालयांना आवाहन केले आहे.
विदर्भातील ज्या नगर परिषदा व तालुका स्तरावरील सरकारी, गैरसरकारी व ट्रस्टतर्फे संचालित रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटरची अत्यंत तातडीची आवश्यकता आहे, त्यांनी माझ्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे. विदर्भातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या बाबी उपलब्ध व्हाव्या यासाठी हे आवाहन करण्यात आले असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
कोरोना चाचणीची मोबाईल लॅब नागपुरात
‘स्पाईस हेल्थ’च्या वतीने आरटी-पीसीआर चाचणी करण्यासाठीची मोबाईल लॅब नागपूरमध्ये दाखल झाली आहे. या लॅबद्वारे ४२५ रुपयांत प्रतिदिन २५०० लोकांची चाचणी केली जाणार आहे. तीन ते चार दिवसांत इन्स्टॉलेशननंतर ही लॅब सुरू होईल. नितीन गडकरी यांच्या विनंतीनंतर ही लॅब नागपुरात पाठविण्यात आली आहे.