लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : शहरी भागासह ग्रामीण भागातही काेराेनाने पुन्हा डाेके वर काढले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे तंताेतंत पालन हाेणे गरजेचे आहे. मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. तसेच दंडात्मक कारवाई व खबरदारीचा उपाय म्हणून काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी पारशिवनी तहसील कार्यालयात भेट देत आढावा घेतला. पुढे बाेलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जी व्यक्ती काेविड पाॅझिटिव्ह आल्यानंतर ती कुठे कुठे गेली याची माहिती घेणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच त्याला लक्षणे येण्याच्या सहा दिवसापूर्वी ताे कुठे कुठे गेला, कुणाला भेटला याची माहिती घेणे आवश्यक आहे. यामुळे ताे ज्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे पाॅझिटिव्ह झाला, याची माहिती प्राप्त हाेईल व काेराेनाचा प्रसार थांबविता येईल. नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, या कामात पाेलीस व तहसील प्रशासनाचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. यावेळी तहसीलदार वरुणकुमार सहारे, रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के, नगराध्यक्ष प्रतिभा कुंभलकर, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नगरसेवक विजय भुते, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत वाघ, डाॅ. चेतन नाईकवार, पाेलीस निरीक्षक संताेष वैरागडे, प्रमाेद मकेश्वर, डाॅ. तारिक अन्सारी, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे, अशाेक खाडे, गटशिक्षणाधिकारी कैलास लाेखंडे तसेच पारशिवनी व रामटेक तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.
....
कंट्राेल रूमचे कार्य महत्त्वाचे
काेराेना काळात तहसील कार्यालयात बनविण्यात आलेल्या कंट्राेल रूमचे कार्य महत्त्वाचे असून, येथे गराेदर महिला, बीपी, शुगर रुग्ण, काेविड पाॅझिटिव्ह रुग्ण, संपर्क यादी, हाेम आयसाेलेटेड रुग्ण, शासकीय व खासगी रुग्णालय, काेराेना टेस्टिंग टीम, फिरते पथक, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका आदींची संपर्क क्रमांकासह सविस्तर माहिती असावी. साेबतच तहसीलदार, डाॅक्टर, मुख्याधिकारी, खंडविकास अधिकारी यांनी कंट्राेल रूमशी नेहमी संपर्कात असावे, जेणेकरून उपाययाेजना तात्काळ राबविता येईल.
...
दंडात्मक कारवाई
भाजी विक्रेते दुकानदार, वाहनचालक, बाहेरून येणारे व्यापारी, फेरीवाले, बाहेरून येणारे प्रवासी, केस कर्तनालय, पानठेले हे सध्या सुपर स्प्रेडर आहेत. याठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच गर्दीविषयक नियमाची कठाेर कारवाई करण्यात यावी. हाॅलवर विशेष लक्ष ठेवावे, दुकानदारांनी नियमाचे पालन केले नाही तर पहिल्यांदा १,००० रुपये दंड आकारून नंतर २ ते ५ हजार करण्यात यावा. तरीही जुमानत नसल्यास सात दिवस दुकान बंद करून पाेलीस कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सामान्य नागरिकांना मास्क अनिवार्य आहे. आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे, अत्यावश्यक सेवा सुरू राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.