नागपूर : नागपूर महापालिका, जिल्ह्यातील विविध नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील सांडपाणी नाग, पिवळी व कन्हान नदीत सोडण्यात येते. या नद्यांमधील दूषित पाणी तसेच भंडारा जिल्ह्यातील नगरपालिकेचे सांडपाणीही वैनगंगा नदीमध्ये येत असल्याने वैनगंगा नदीतील पाणी दूषित होत आहे. यावर नियंत्रणासाठी नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठीच्या लघू व दीर्घकालीन उपाययोजनांचे कृती आराखडे तातडीने सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मंगळवारी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, उप प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांच्यासह नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्याधिकारी, जलसंपदा विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नाग, पिवळी, कन्हान व वैनगंगा नदी प्रदूषणविषयक माहितीचे सादरीकरण केले.