नाल्यावर १२ एसटीपी बसविणार : १.२१ कोटीचा खर्च अपेक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील १२ बगिचालगत वाहत असलेल्या नाल्यावर एसटीपी संयंत्र बसवून नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करुन या पाण्याचा पुनर्वापर बगिचा व बांधकामासाठी केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.
१२ एसटीपीवर १.१२ कोटी तर प्रकल्पाची देखभाल व दुरुस्तीसाठी ९ लाख असा १.२१ कोटीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बगिचे, शौचालय, लोककर्म विभागाला रस्त्यांच्या कामासाठी करता येईल.यातून महापालिकेला वर्षाला २.६ लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे तर १२ एसटीपीमुळे दररोज ०.१०५ द.ल.लि.वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करता येईल.
नागपूर शहराच्या विविध भागातून २६० नाले वाहतात. यात दूषित पाणी सोडले जाते. पुढे ते नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीला मिळतात. यामुळे नद्यांचे पाणी दूषित झाले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे. काही प्रमाणात का होईना या प्रकल्पामुळे दूषित पाण्यावर प्रक्रिया होणार आहे.