लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एका प्रकरणात ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांना अवमानना नोटीस बजावली.आजनसरा, ता. हिंगणघाट (जि. वर्धा) येथील सरपंच रजनी कोसूरकर व उपसरपंच सुनील गुजरकर यांना १४ सप्टेंबर २०१४ रोजी अपात्र घोषित करण्यात आले. त्याविरुद्ध त्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. कायद्यानुसार हे अपील ३० दिवसांत निकाली काढणे आवश्यक होते. परंतु, भुसे यांनी हा कालावधी लोटूनही अपीलवर निर्णय दिला नाही. त्यामुळे कोसूरकर व गुजरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या ३१ जानेवारी रोजी न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या अपीलवर तीन आठवड्यांत निर्णय देण्याचा आदेश भुसे यांना देऊन याचिका निकाली काढली होती. त्यानंतर भुसे यांनी या आदेशाचे पालन केले नाही. परिणामी कोसूरकर व गुजरकर यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर, भुसे यांना नोटीस बजावली व यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. मंगेश बुटे व अॅड. रोमा सोनारे यांनी कामकाज पाहिले.