ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना अवमान नोटीस
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 21, 2023 06:38 PM2023-03-21T18:38:26+5:302023-03-21T18:38:52+5:30
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश झुगारून दूर्गम भागात बदली केल्यामुळे ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांना अवमान नोटीस बजावली आहे.
राकेश घानोडे
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश झुगारून दूर्गम भागात बदली केल्यामुळे २९ विशेष शिक्षकांनी ॲड. संतोष चांडे यांच्यामार्फत ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये यांना अवमान नोटीस बजावली आहे.
७ एप्रिल २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष शिक्षकांची त्यांनी स्वत: विनंती केल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी बदली करता येत नाही. असे असताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी वादग्रस्त आदेश जारी करून या विशेष शिक्षकांचा, त्यांच्या मजीर्विरुद्ध, दूर्गम भागात बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांच्या यादीत समावेश केला. त्याविरुद्ध या शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने गेल्या १६ व १७ मार्च रोजी सरकारला नोटीस बजावून यावर २७ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले होते. तसेच, तेव्हापर्यंत या शिक्षकांची बदली करण्यास मनाई केली होती. त्यानंतरही २१ मार्च रोजी या शिक्षकांची विविध दूर्गम भागात बदली करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. ही चुक दुरुस्त करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.