लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील अरविंद वाघमारे यांच्यावरील अवमानना कारवाईची बुधवारी दिवसभर चर्चा राहिली. वाघमारे यांना त्यांच्याविरुद्ध नवीन अवमानना नोटीस जारी झाल्यामुळे सुरुवातीला दणका सहन करावा लागला तर, त्यानंतर त्यांनी स्वत:ची चूक सुधारून बिनशर्त माफी मागितल्यामुळे अवमानना नोटीस रद्द होऊन त्यांना दिलासा मिळाला. तेव्हापर्यंत मात्र, वाघमारे यांचे काय होते हाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. प्रकरणावरील सुनावणी पाहण्यासाठी शेकडो वकिलांनी न्यायालयात गर्दी केली होती.उच्च न्यायालयात वाघमारे व इतर चौघांविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका प्रलंबित आहे. ती याचिका न्यायालयाने स्वत:च दाखल करून घेतली आहे. तसेच, या कारवाईविरुद्ध वाघमारे व इतरांनी अपील दाखल केले आहे. या दोन्ही प्रकरणांवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय झेड.ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होती. पहिल्या सत्रात सुनावणी सुरू झाल्यानंतर वाघमारे यांनी न्यायालयाचा अवमान करणारी कृती केली. त्यामुळे न्यायालयाने त्यांची चांगलीच कानउघाडणी करून त्यांच्याविरुद्ध नवीन अवमानना नोटीस जारी केली व पोलिसांना बोलावून त्यांना ताब्यात घेण्याचा आदेश दिला. पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर हे प्रकरण दुसऱ्यासत्रामध्ये सुनावणीसाठी घेण्यात आले असता वाघमारे यांनी विस्तृत स्पष्टीकरणासह माफीनामा सादर करून अवमानना कारवाई रद्द करण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांचे तत्काळ बदललेले रूप पाहता त्यांना माफ करण्याची तयारी दर्शविली, पण त्यासाठी त्यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आले. त्यांनी विस्तृत स्पष्टीकरणासह सादर केलेला माफीनामा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर काही वेळाने प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आले. दरम्यान, वाघमारे यांनी नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागितली. न्यायालयाने त्यांना माफ करून नवीन अवमानना कारवाई रद्द केली. तसेच, जुन्या अवमानना प्रकरणावर २ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. वाघमारे यांनी स्वत: बाजू मांडली. न्यायालय मित्र म्हणून अॅड. रजनीश व्यास तर, उच्च न्यायालय प्रशासनातर्फे वरिष्ठ वकील आनंद जयस्वाल व अॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.शिक्षा करून आनंद मिळत नाहीवकिलांना शिक्षा करून आम्हाला कोणताही आनंद मिळत नाही. परंतु, परिस्थिती खूपच गंभीर झाल्यास कारवाई करणे आवश्यक होऊन जाते असे मौखिक मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले. तसेच वाघमारे यांना योग्य समज देऊन भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.