लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे. गेल्या काही दिवसात लागोपाठ बैठका घेऊन शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले होते. गुरुवारी त्यांनी खड्डे बुजण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. खड्डे बुजवण्याचे काम दिवसरात्र काम सुरू ठेवा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.बांगर यांनी प्रारंभी लोहापूल आणि त्यानंतर कॉटन मार्के ट येथील मेट्रोच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. मेट्रोच्या कामामुळे पडलेले खड्डे नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बुजवावे, असे निर्देश दिले. रस्त्यालगत असलेले पाणी काढून आवश्यक तेथे पाईपलाईन टाकण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर ते अजनी चौकात पोहोचले. अजनी चौकातून खामला चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्याचे कार्य सुरू होते. या कामाच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. प्रत्येक झोनमधील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रत्येकाच्या क्षेत्रातील कामाची माहितीही त्यांनी जाणून घेतली. खड्डे बुजविण्याचे काम दिवसरात्र असे दोन पाळीमध्ये सुरु ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपाच्या हॉटमिक्स प्लँटवर जर अधिक भार येत असेल तर नासुप्रच्या हॉटमिक्स प्लँटची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. खड्डे बुजविताना वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी अन्य रस्त्यांवरून वाहतूक वळवावी, यासाठी त्यांनी स्वत: वाहतूक पोलीस उपायुक्तांशी चर्चा केली. वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून वाहतुकीत अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.लोहापूलचा मार्ग, मनीषनगर मार्ग, अवस्थीनगर चौक, सीआयडी रोड, सेंट्रल एव्हेन्यू रोड, गोमती हॉटेल,पारडी मार्ग, झिंगाबाई टाकळी, गोधनी रोड, फ्रेंड्स कॉलनी रोड, कामठी रोड, मेट्रोचे काम सुरू असलेल्या भागातील रस्ते, मोक्षधाम घाट रस्ता अशा अनेक भागातील डांबरी रस्त्यांवर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे आहेत. याशिवाय शहरातील वस्त्यांमधील अंतर्गत डांबरी रस्त्यांची अवस्था बिकट आहे.अधिकारी लागले कामालाआयुक्तांच्या निर्देशानुसार मंगळवारी रात्रीपासूनच खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली. मेडिकल चौकाकडून क्रीडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर जेट पॅचर मशीनच्या साहाय्याने खड्डे बुजवण्यात आले. खड्ड्यात साचलेले पाणी हवापंपाने उडवून खड्डा मोकळा करून त्यात डांबर व गिट्टी टाकून बुजविण्यात येत होता. मेडिकल चौकाप्रमाणेच रामबागकडे जाणारा मार्ग दोन दिवसांपूर्वी सिमेंटीकरणासाठी बंद करून दुभाजक व रस्ता खोदण्यास सुरुवात करण्यात आली. दोनच दिवसात या रस्त्याचा काही भाग पुन्हा मोकळा करून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. वंजारीनगर जलकुंभाजवळच्या भागात ठिकठिकाणी खड्डे बुजविले परंतु येथे रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी खडसावल्याने अधिकारी कामाला लागले आहेत.
खड्डे बुजविण्याचे काम दिवसरात्र सुरू ठेवा! मनपा आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 9:11 PM
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे. गुरुवारी त्यांनी खड्डे बुजण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. खड्डे बुजवण्याचे काम दिवसरात्र सुरू ठेवा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ठळक मुद्देसुरू असलेल्या कामाची केली पाहणी