लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, विधवा, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गट यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंबेडकरवादी संघर्ष पार्टीने विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चात श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आय.एल. नंदागवळीयांनी केले.श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा, महिला, अपंग, निराधार यांचे मानधन बंद करू नका, विधवा महिलांचे २५ वर्षांचे मूल झाल्यावर व अपंगाचे वय २५ वर्षे झाल्यावर मानधन सुरूच ठेवा, ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर, कामगारांना ५४०० रुपये मानधन द्या, जबरान जोत शेती वाहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या, वृद्ध, विधवा, महिला, अपंग, निराधार यांना घरकूल द्या, आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना दिले. शिष्टमंडळात आय.एल. नंदागवळी यांच्यासह मनोरमा डोंगरे, पी.टी खंडारे, सुनील निकोसे, प्रज्ञा जगथाप, चरणदास रामटेके, प्रज्ञावंत वासनिक, अशोख खंडारे, शेषराव ढाले, शकुन शेंडे आदींचा सहभाग होता.