लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन व व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी बुधवारी व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने ‘स्टडी सर्कल’ उपक्रमांतर्गत न्या. जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना सखोल मार्गदर्शन केले. ‘वकील म्हणून माझे जीवन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. उत्कृष्ट वकील म्हणून स्वत:ला विकसित करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास करणे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविणे, शारीरिक हालचाली नियंत्रित ठेवणे व संवादकौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. वकिली व्यवसायात प्रवेश केल्यानंतर मी सर्वप्रथम याच गोष्टींवर परिश्रम घेतले. तसेच, मार्गदर्शक वरिष्ठ वकिलांच्या कार्यालयात वावरताना ती एक शाळा आहे ही आपली भावना असली पाहिजे. वरिष्ठांच्या कार्यालयातून शक्य होईल तेवढे ज्ञान गोळा करावे. तो ठेवा आयुष्यभर पुरतो असे न्या. जाधव यांनी सांगितले.नोकरीमध्ये समाधान मिळाले नाही म्हणून वकिली व्यवसायात आलो होतो. त्यापूर्वी रिलायन्सचे धीरुभाई अंबानी यांचे जीवनचरित्र वाचनात आल्यामुळे काहीतरी वेगळे करण्याची प्रेरण मिळाली होती. आईवडील सरकारी कर्मचारी होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर मध्य रेल्वेत नोकरी मिळाली होती. वकिली करण्यासाठी ती नोकरी सोडली अशी माहितीही न्या. जाधव यांनी यावेळी दिली. संघटनेच्या अध्यक्षा अॅड. गौरी वेंकटरमण, उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील व सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन करा : न्या. मिलिंद जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 10:13 PM
यशस्वी वकील होण्यासाठी निरंतर ज्ञानार्जन व व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी बुधवारी व्यक्त केले.
ठळक मुद्देहायकोर्ट बार असोसिएशनचा कार्यक्रम