सर्वोत्तम होण्यासाठी निरंतर शिकत राहणे आवश्यक : सुबोध धर्माधिकारी यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:24 PM2019-07-24T23:24:23+5:302019-07-24T23:25:33+5:30
आयुष्यात सर्वोत्तम व्हायचे असेल तर, निरंतर शिकत राहणे आवश्यक आहे. नवीन काहीच शिकायची इच्छा नसणारा कधीच प्रगती करू शकत नाही, असे मत शहरातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यात सर्वोत्तम व्हायचे असेल तर, निरंतर शिकत राहणे आवश्यक आहे. नवीन काहीच शिकायची इच्छा नसणारा कधीच प्रगती करू शकत नाही, असे मत शहरातील प्रसिद्ध वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या ‘स्टडी सर्कल’ उपक्रमांतर्गत बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात धर्माधिकारी यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आतापर्यंतच्या कारकिर्दीत भरपूर फौजदारी प्रकरणे हाताळली. शिकण्याची इच्छा असल्यामुळे सतत नवनवीन ज्ञान प्राप्त करीत गेलो. शिकण्याची जिद्द आजही तशीच कायम आहे. त्यातून घडण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. घरात वकिलीची पार्श्वभूमी नसतानाही केवळ लॉर्ड डेनिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे वकिली व्यवसायात येण्याचा निर्धार केला होता. यशस्वी होण्याचा विश्वास होता. त्यामुळे हातातील नोकरी सोडली होती. सुरुवातीला अॅड. एच. एस. घारे, अॅड. के. एच. देशपांडे व अॅड. व्ही. आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली. स्वतंत्र झाल्यानंतर मिळेल ती प्रकरणे स्वीकारून सतत काम करीत राहिलो. त्याचा व्यवसायात फायदा झाला, असे धर्माधिकारी यांनी सांगितले. अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी स्वागत केले तर, उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले.
इंग्रजीसाठी सखोल वाचन
मराठी भाषेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. इंग्रजी पुस्तकांचे सखोल वाचन करावे लागले. त्यातून इंग्रजी बोलण्यावर प्रभुत्व मिळविले व ड्राफ्टिंगमध्येही अचूकता आली, अशी माहिती धर्माधिकारी यांनी यावेळी दिली.