आनंद शर्मा
नागपूर : मेट्रो रेल्वे कोच कारखाना नागपुरात उभारण्यासाठी राज्य सरकार आणि चीन रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन (सीआरआरसी) यांच्यात पावणेपाच वर्षांपूर्वी झालेला सामंजस्य करार अजूनही कागदावर धूळ खात आहे. या कराराचे पुढे काय झाले, याची माहिती सरकारी स्तरावर कुणालाच नाही. मात्र, या करारामुळे पाच हजार युवकांचे रोजगाराचे स्वप्न भंगले आहे. चीनच्या मेट्रो कोच कारखान्याचे काय झाले, अशी विचारणा युवकांकडून होत आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबर २०१६ ला झालेल्या एका भव्य समारंभात राज्य सरकार आणि सीआरआरसी यांच्यात नागपुरात चिनी मेट्रो रेल्वे कोच कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) झाला होता. सीआरआरसी मिहानमध्ये १५०० कोटींच्या गुंतवणुकीतून कोच निर्मिती आणि पाच हजार युवकांना रोजगार मिळेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता, तर दुसरीकडे कराराद्वारे नागपुरातून देशभरातील मेट्रो प्रकल्पांना कोचचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले होते. यावेळी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ६९ अल्ट्रा मॉडर्न कोचची ऑर्डर सीआरआरसीला देण्यात आली होती. करारानंतर सीआरआरसीच्या चमूने शहरात कोच युनिट लावण्यासाठी जागाही पाहिली; पण आता हे प्रकरण थंडबस्त्यात गेले आहे. पुढे राज्य सरकार बदलल्याने युनिट केवळ करारापुरते मर्यादित राहिले.
महामेट्रोचा कोच कारखाना थंडबस्त्यात
महामेट्रो स्वत: मेट्रो कोचचा कारखाना सुरू करेल, असा दावा पूर्वी करण्यात आला होता. कारखाना सिंदी, बुटीबोरीजवळ राहील, असेही म्हटले जात होते; पण हा प्रकल्प थंडबस्त्यात गेला आहे.
मेट्रोचा दुसरा टप्पा मंजुरीसाठी अडकला
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला फेब्रुवारी २०२१ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली; पण सहा महिन्यांनंतरही केंद्रीय कॅबिनेटची हिरवी झेंडी मिळालेली नाही. त्यामुळे फंडच्या व्यवस्थेसह दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम सुरू झालेले नाही.
एमएडीसीकडे प्रस्ताव नाही
मिहानमध्ये चिनी कंपनीचा मेट्रो कोच कारखाना उभारण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र एअरपोर्ट विकास कंपनी (एमएडीसी), नागपूर कार्यालयाला अजूनही मिळालेला नाही.
- दीपक जोशी, जनसंपर्क अधिकारी, एमएडीसी.
हा तर सीआरआरसीचा प्रकल्प
चिनी मेट्रो कोच कारखान्याचा प्रकल्प बराच जुना असून, चीनची सीआरआरसी कंपनी नागपुरात उभारणार होती. याचा महामेट्रोशी काहीही संबंध नाही.
- अखिलेश हळवे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.
चिनी कंपनीच्या चमूने केली होती पाहणी
मेट्राे कोच कारखान्यासाठी चिनी कंपनीच्या चमूने अनेक वर्षांपूर्वी एमआयडीसी क्षेत्राची पाहणी केली होती. प्रकल्प कुठे उभारायचा हे निश्चित नव्हते. त्यानंतर काय झाले माहिती नाही.
- भानुदास यादव, विभागीय अधिकारी, एमआयडीसी.
करारानंतर काहीच झालेले नाही
चिनी मेट्रो रेल्वे कंपनीसोबत राज्याच्या उद्योग विभागाचा करार झाला होता. त्यानंतर पुढे काहीच झाले नाही.
- अशोक धर्माधिकारी, सहसंचालक (उद्योग), उद्योग संचालनालय, नागपूर विभाग.