लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नासुप्रकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या गुंठेवारी प्रणालीचे व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीच्या निविदेला प्रशासकीय मंजुरी न घेता नगर रचना विभागाने परस्पर मे.आय.टी.क्राप्ट टेक्नाॅलॉजी प्रा. लि. कंपनीला काम दिले. २ कोटी ९ लाख ८५ हजार ४० रुपयाचे तीन वर्षाचे कंत्राट दिल्यानंतर नगर रचना विभागाने प्रशासकीय मंजुरीसाठी हा विषय स्थायी समितीकडे पाठविल्याने हा प्रकार उघडकीस आला.
भूखंड मालकांना आरएल, त्यासंबधीचे देयके तयार करण्याचे कंत्राट तत्कालीन मनपा आयुक्तांच्या संमतीने देण्यात आले. यावर स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली . या कामाच्या तात्काळ लघु निविदा काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
नासुप्रकडून गुंठेवारी प्रणालीचे हस्तांतरण मनपाकडे करण्यात आले आहे. मात्र नगर रचना विभागाकडे यासाठी सक्षम यंत्रणा नाही. या प्रणालीचे दैनंदिन व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्नीसाठी मे.आय.टी.क्राप्ट कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. कंपनीने काम सुरू केल्यानंतर प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला.
......
काम दिल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव
नियमानुसार स्थायी समितीच्या मंजुरी नंतर निविदा काढणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासनाने मंजुरी न घेता निविदा मंजूर करून प्रस्ताव स्थायी समितीकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला. मर्जीतील लोकांना कंत्राट मिळावे, यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.
.....
नियमबाह्य मार्गाचा वापर कशासाठी?
मनपा प्रशासनाला कोणतेही आर्थिक व्यवहार ठरवताना स्थायी समितीची परवानगी घेणे, सूचित करणे आवश्यक आहे. परंतु मे.आय.टी.क्राफ्ट कंपनीला निविदा न काढताच मागच्या दाराने सरळ काम देऊन तसेच दोन वेळा मोबदल्याच्या रकमेत बदल करून काम देण्यात आले. यासाठी मागच्या दाराचा वापर कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.