नागपूर : पर्यावरणवाद्यांच्या मागणीनुसार फुटाळा तलाव परिसरात वृक्षताेडीबाबत चाैकशी करण्यात येईल. यामध्ये गैरप्रकार किंवा अवैध वृक्षताेड झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमाेल चाैरपगार यांनी दिली. दरम्यान या कामाशी संबंधित कंत्राटदार डी.पी. जैन आणि मेट्राे रेल्वेला ‘शाे काॅज’ नाेटीस पाठविल्याची माहिती त्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.
मंगळवारी झालेल्या जनसुनावणीदरम्यान फुटाळा प्रकरण तसेच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) तील प्रस्तावित वृक्षताेडीवरून पर्यावरणप्रेमींकडून झालेल्या आराेप प्रत्याराेपानंतर महापालिकेचे वातावरण चांगलेच तापले आहे. जनसुनावणी केवळ इतवारी रेल्वे स्टेशन ते दिघाेरी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रेल्वे ट्रॅकच्या कामात अडथळा हाेणाऱ्या झाडांसाठी घेण्यात आली हाेती. मात्र पर्यावरणवाद्यांनी फुटाळा आणि नीरीतील प्रकल्पाचा मुद्दा नाहक उपस्थित केल्याचा आराेप त्यांनी केला. जनसुनावणी संदर्भातील जाहिरातीच्या प्रक्रियेमुळे गैरसमज झाल्याचे ते म्हणाले. नीरीच्या प्रस्तावित वृक्षताेडीबाबत आक्षेप मागविण्याचा स्थानिक प्राधिकरण म्हणून आम्हाला अधिकार आहे व त्यानंतर राज्य प्राधिकरणाकडे सादर करू, असेही चाैरपगार यांनी स्पष्ट केले. फुटाळा प्रकरणात सर्वेक्षण व चाैकशी करू. यात वृक्षतोडीचा गैरप्रकार आढळल्यास गुन्हा दाखल करू, अशी हमी त्यांनी दिली.
४०० वृक्षांच्या कत्तलीवर पर्यावणवादी ठाम
फुटाळा तलाव परिसरात १६ किंवा २८ नाही तर ४०० च्यावर झाडांची कत्तल झाल्याच्या आराेपावर पर्यावरणवादी कायम आहेत. अंबाझरी स्टेशनचे पाेलीस निरीक्षक अशाेक बागुल यांना तशी तक्रारही त्यांनी दिली आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही तक्रार देण्यात आल्याचे अनसूया काळे-छाबराणी यांनी सांगितले. प्रशासकीय यंत्रणांनी तीन महिन्यात कारवाई केली नाही तर न्यायालयात जाणार व न्यायालयाद्वारे गुन्हा नाेंदविणार, असा इशारा त्यांनी दिला.
झाडे चाेरी गेल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
दरम्यान ॲड. अभियान बाराहाते यांनी फुटाळ्यातील झाडे अवैधपणे ताेडून लाकडे विकल्याचा आराेप केला. कंत्राटदार किंवा कंपनीने टीनाचे बॅरिकेट्स लावून आत वृक्षतोड केली. हा प्रकार जानेवारीपासून सुरू आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच पाेलीस आयुक्त आणि डीसीपी यांच्याकडेही तक्रार दाखल केली.