कोराडी : वीजनिर्मिती केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके महानिर्मितीकडे थकीत आहेत. कंत्राटदारांना वेळेवर देयके प्राप्त होत नसल्याने बहुतेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत. परिणामी, त्यांच्याकडे असणाऱ्या कंत्राटी कामगारांनाही वेळेवर पुरेसे वेतन देण्यात आर्थिक अडचणी येत आहेत. कामगारांचे पुरेसे वेतन वेळेवर न झाल्यास कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानिर्मितीने कंत्राटदाराची जास्तीत जास्त देयके देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी एम.एस.ई.बी.कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोराडीचे अध्यक्ष रत्नदीप रंगारी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले आहे. कोरोना साथीच्या काळात मागील एक वर्षापासून वीजनिर्मितीतील कंत्राटदारांची देयके पूर्ण दिल्या जात नाहीत किंवा विलंबाने प्राप्त होतात. त्यामुळे अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत. प्रत्येक कंत्राटाची देयके सादर करताना कंत्राटदाराला जीएसटी, कामगारांचा पीएफ व ईएसआयसीची रक्कम भरावी लागते. एकीकडे महानिर्मितीकडून देयके वेळेवर व पूर्णपणे प्राप्त होत नसताना कामगारांचे वेतन व इतर रकमेची कपात नियमित करून द्यावी लागते. अशा स्थितीत कंत्राटदार आर्थिक अडचणीत आला आहे. जीएसटी थकीत राहिल्यास संबंधित विभागाकडूनही कंत्राटदाराला वारंवार पत्र दिले जात आहे. अनेकांनी कर्ज काढले असून, काहींनी आपल्याकडे असलेली संपत्ती गहाण ठेवून निधी उभारावा लागत आहे. या काळात बहुतेक २५ ते ५० टक्केच देयके प्राप्त होत आहेत. अशी स्थिती राहिल्यास कंत्राटदारांवर आर्थिक संकट ओढवेल. कामगारांना वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांच्यातही असंतोष निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणून वीजनिर्मितीत कामगारांच्या असंतोषाचा सामना करावा लागेल. या बाबीकडे ऊर्जामंत्र्यांनीही लक्ष द्यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महानिर्मितीकडे कंत्राटदारांची देयके थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:10 AM