नागपूर : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आधीच कमी वेतन त्यात कंत्राटदार अधिकाऱ्यांचे नाव घेऊन पैसे मागत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सोमवार पेठ येथील राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षाचा आत शिरून गोंधळ घातला. पोलिसांनी हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की झाल्याचे व यात दोन महिला पोलिस जखमी झाल्याचे बोलले जाते.
कामगार विमा रुग्णालयाचा (ईएसआयएस) वॉर्डातील साफसफाईसाठी एका खासगी कंपनीचे जवळपास ५० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, रुग्णालय प्रशासन संबंधित कंपनीच्या खात्यात पैसे जमा केल्यावर कर्मचाऱ्यांना रोखीने वेतन दिले जाते; परंतु ते देताना रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने दोन ते अडीच हजार रुपयांची मागणी केली जाते. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास २० ते २५ संतप्त कर्मचारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्या कक्षात शिरले.
कर्मचाऱ्यांचा संताप पाहता डॉ. देशमुख यांनी फोन करून पोलिसांना मदत मागितली. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना कक्षाच्या बाहेर काढले; परंतु पोर्चमध्ये त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी जास्तीची कुमक मागवून घेतली. वरिष्ठ पोलिसही हजर झाले. कर्मचाऱ्यांना ताब्यात घेताना दोन महिला पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात येते. यावेळी पोलिसांनी १३ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. परवानगी नसताना रुग्णालयाच्या आत गोंधळ घातल्याप्रकरणी डॉ. देशमुख यांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
- गोंधळ घालणाऱ्यांमध्ये दोन कर्मचारी रुग्णालयातील
ताब्यात घेतलेल्या १३ जणांमध्ये दोनच कर्मचारी कामगार विमा रुग्णालयातील असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, अधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार कोणत्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली नाही. आमचा व्यवहार कंत्राटदाराशी असतो, त्यांच्याच खात्यात पैसे जमा करतो.
- नेत्याला आली चक्कर, डॉक्टरांनी केले प्रथमोपचार
रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यामध्ये पुढे असलेल्या नेत्यालाच चक्कर आल्याने रुग्णालयातील डॉक्टर धावून आले. त्यांनी प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेतून मेडिकलला पाठविले.