नागपूर : सरकारकडून विविध योजनांवर अनुदान दिले जाते. परंतु सक्षम असलेल्या लोकांनी घरगुती वापराच्या गॅसवरील अनुदान परत करू न राष्ट्र निर्माण कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन खासदार अजय संचेती यांनी रविवारी केले. छात्र जागृतीतर्फे आयोजित ‘राष्ट्र निर्माण मे मेरा योगदान ’अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. कृपाल तुमाने, हिंदुस्तान पेट्रोलियमचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक अमितावा धार, इंडियन आॅयल कार्पोरेशनचे संजीव माथूर, भारत पेट्रोलियमचे अजय भगत व कार्यक्रमाचे संयोजक अॅड. निशांत गांधी आदी उपस्थित होते. राष्ट्र निर्माण मे मेरा योगदान ही एक चळवळ व्हावी, सुरुवातीला लहान स्वरूप असले तरी भविष्यात ती व्यापक चळवळ होईल. माझ्यापासून या अभियानाचा प्रारंभ करीत असल्याचे संचेती यांनी सांगितले.लोकांना गरज नसतानाही सरकारी अनुदान घेण्याची सवय झाली आहे. ज्यांना गरज आहे, त्यांनीच अनुदान घ्यावे. सक्षम असलेल्यांनी ते घेऊ नये. पाच लाखाहून अधिक आयकर रिटर्न भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ न देण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची माहिती कृपाल तुमाने यांनी दिली. निशांत गांधी यांनी प्रास्ताविकातून राष्ट्र निर्माण मे मेरा योगदान अभियाची माहिती दिली. नागपूर शहरात १०.५० लाख गॅस ग्राहक आहेत. यातील जेमतेम १ हजार लोकांनी गॅसवरील अनुदान नाकारले आहे. सक्षम लोकांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जे नागरिक विना अनुदानावरी गॅस सिलेंडर घेण्यास सक्षम आहेत त्यांनी अनुदान नाकारून राष्ट्र निर्माण कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन असलेल्या पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मोहम्मद सलीम यांनी संचलन तर विश्वजीत भगत यांनी आभार मानले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे सचिव अतुल कोटेचा, राजन ढढ्ढा, अमित बागवे, गजेंद्र पांडे, पार्थ मुजूमदार, नितीन पुणेकर, मेहुल तारेकर, चेतानंद रामटेके यांच्यासह छात्र जागृतीचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
राष्ट्र निर्माण कार्यात योगदान द्या!
By admin | Published: March 02, 2015 2:34 AM