नागपूर : न्यायव्यवस्था हा लोकशाही व्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ आहे. तो मजबूत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या विधि शिक्षणाची आवश्यकता असून येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठ त्यादृष्टीने महत्त्वाचे आणि जागतिक दर्जाचे ठरणार आहे. राष्ट्रीय दृष्टिकोन आणि चारित्र्य विकसित करण्यासाठी हे विद्यापीठ निश्चितच महत्त्वाचे योगदान देईल, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.शहराजवळच्या वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश तथा या विद्यापीठाचे संस्थापक कुलपती शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नागपूर नितीन राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजेंद्रकुमार आदी उपस्थित होते.प्रारंभी विधि विद्यापीठाच्या निर्मितीमागचा ओझरता प्रवास सरन्यायाधीश बोबडे यांनी मांडला. न्यायमूर्ती भूषण गवई हे या विधि विद्यापीठाचे कुलपती असतील, असे त्यांनी जाहीर केले. या विद्यापीठातून राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. कारण देशभरातील प्राध्यापक आणि विद्यार्थी येथे अध्ययन-अध्यापन करणार आहेत. ऑक्सफर्ड - हॉर्वर्ड-केम्ब्रिज या विद्यापीठाच्या तोडीचे विद्यापीठ ठरणार आहे, असा विश्वासही न्या. बोबडे यांनी बोलून दाखविला. कायद्याची चौकट पाळणाऱ्या महाराष्ट्राला न्यायदानाची मोठी आणि आदर्श परंपरा लाभल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीचे छत समर्थपणे तोलून धरणारे वकील, विधिज्ञ या विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.विधि क्षेत्रात गुणात्मक बदल व्हावा, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ उभारावे या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले. तर मजबूत न्यायव्यवस्था उभारण्यासाठी हे विद्यापीठ मोठे योगदान देईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विधि विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे - शरद बोबडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:49 AM