मनपा निवडणूक विभागाचा हस्तक्षेप नाही : कर्मचारीही अनिच्छुकराजीव सिंह नागपूरचार सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या आधारे मनपाची येणारी निवडणूक होणार आहे. यासाठी राज्य सरकारने जीआर निर्गमित केला आहे. परंतु प्रभाग पद्धतीवरून चर्चेचा जोर सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग पद्धतीद्वारे होणारी निवडणूक, निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होणार आहे. यात मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुठलीही भूमिका राहणार नाही. मुख्य मार्ग व प्रमुख क्षेत्राचा आधार घेऊन, गुगल जीपीएस मॅपिंगद्वारे वस्त्या जोडण्यात व कमी करण्यात येईल. यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात येणार आहे. प्रभाग रचनेनंतर लोकांच्या तक्रारी व सूचनेसाठी प्रकाशितही करण्यात येईल. प्रभाग रचनेत कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही, यासाठी आयोगाने याची जबाबदारी स्वत:कडे ठेवली आहे. आॅगस्ट व सप्टेंबरच्या दरम्यान प्रभाग रचना होऊ शकते. सूत्रांच्या मते यापूर्वी मनपाच्या निवडणूक विभागातर्फे करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आले होते. काही कर्मचाऱ्यांना राजकीय दबावाचा फटका बसला होता. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेत मनपाच्या निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे. महापालिकेत १४५ नगरसेवक आहे. याच आधारावर चार सदस्यीय प्रभागाची संख्या ३५ होते. तर एक प्रभाग ५ सदस्यांचा राहील. एका प्रभागात ६० ते ७० हजार मतदार राहतील. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण कायम असल्याने एका प्रभागात दोन महिलांचा समावेश राहणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सामान्य वर्गातील उमेदवारांना फायदा होणार आहे. आरक्षणात प्रभाग गेल्याने ते निवडणूक लढू शकत नव्हते. परंतु आता त्यांच्याजवळ निवडणूक लढण्याची संधी आहे.
निवडणूक आयोगाच्या नियंत्रणातच प्रभाग रचना!
By admin | Published: June 13, 2016 3:14 AM