इंडियन मेडिकल असोसिएशन : रक्तदाबाच्या विविध प्रकारांवर व्याख्यान नागपूर : हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब वाढणे. पण रक्तदाबामुळे अनेक समस्या निर्माण होतात. सध्याच्या धावपळीच्या जगात अनेक समस्यांना सामोरे जाताना माणसाला ताणतणाव नित्याचेच झाले आहे. यामुळे रक्तदाबाची स्थिती निर्माण होते. पण रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी आणि डॉक्टर्स मंडळींनी रुग्णांवर कसे उपचार करावे, याबाबत विविध तज्ज्ञ मंडळींनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले. हायपरटेन्शनची योग्य काळजी घेतली तर नक्कीच त्याला नियंत्रणात ठेवता येते, असा सूर यावेळी सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने ‘हायपरेन्शन आणि त्याचे व्यवस्थापन’ विषयावर आज आयएमएच्या सभागृहात, उत्तर अंबाझरी मार्ग येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. रक्तदाबामुळे अनेक धोके निर्माण होतात. त्याचा परिणाम किडनी, हृदय, पाय, डोळे आदी अवयवांवरही होतो. हृदयरोगाचाही धोका रक्तदाबामुळे वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवला तर संभाव्य धोक्यापासून आपल्याला बचाव करता येतो.मधुमेह असलेल्यांना रक्तदाबाचा त्रास असेल तर औषधे बदलावी लागतात. यात काही औषधांमध्ये बदल करणे अतिशय आवश्यक आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन कमी करणे, फायबर अन्नात वाढविणे, चरबी कमी करणे, तेल कमी खाणे हे उपाय करणे गरजेचे आहे. औषधांशिवाय प्रत्येकानेच ३० मिनिटात ३ कि. मी. पायी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याचे मत यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केले. अनेकदा रुग्ण रक्तदाबाचा त्रास कमी झाला की औषधे घेणे सोडतात. पण ते चुकीचे आहे. रक्तदाबाची तपासणी नियमित करावी. यात वयाप्रमाणे होणारे आणि अनुवंशिकतेमुळेही रक्तदाबाचा त्रास होतो. पण त्यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यात डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. पी. पी. देशमुख, डॉ. डी. आर. होरे, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. अभिजीत अंभईकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
हायपरटेन्शनची योग्य काळजी घेतली तर त्यावर नियंत्रण
By admin | Published: January 29, 2015 1:00 AM