सावनेर : दारूच्या नशेत हाफ पॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा सावनेर येथील हरिभाऊ आदमने कला, वाणिज्य महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमडे याला सोमवारी निलंबित करण्यात आले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सावनेर पोलिसांनी जुमडे याच्यावर भादंवि ३५४, ५०४, पोक्सो-२०१२चे कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करून २२ जुलै रोजी रात्री अटक केली होती. २३ रोजी सावनेर येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी महाविद्यालय संचालित करीत असलेल्या खापा येथील राष्ट्रीय विकास शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक झाली. तीत जुमडे याला प्राचार्य पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी संस्थेचे अध्यक्ष दामोदर पराते यांनी याबाबतचे आदेश जारी केले. महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्यपदी डॉ. प्रशांत पाटील यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीपासून जुमडे यांची प्राचार्य पदाची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. गतवर्षी लॉकडाऊन काळात महाविद्यालयात पार्टी केल्याचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.