राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंबाबत वादग्रस्त विधान; भाजप आक्रमक, नागपुरात काँग्रेस नेत्याचा पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 05:56 PM2022-07-28T17:56:12+5:302022-07-28T18:31:43+5:30
AR Chowdhury on Draupadi Murmu : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींविरोधात नागपुरात भाजपचे आंदोलन
नागपूर : काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकारण तापलं आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्दप्रयोग चौधरी यांनी केला होता. चौधरी यांच्या या शब्दानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. नागपुरात भाजप युवा मोर्चाने अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला. भाजपने काँग्रेसवर टीका करत चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी केली. नगपुरात भाजपकडून चौधरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. राजे बख्त बुलंदशहा चौकात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेस विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, चौधरी यांच्या या शब्दानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली असून, पक्षाध्यक्ष सोनिय गांधी यांनीही माफी मागण्याची मागणी केली. तर, या प्रकरणावर चौधरी यांनी आपली बाजू मांडली आहे, ''मी भारताच्या राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा विचारही कधी करू शकत नाही. माझ्याकडून चूक झाली. राष्ट्रपतींना याबाबत वाईट वाटले असेल तर मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटेन आणि माफी मागेन,'' असे चौधरी म्हणाले.
'...तर फासावर लटकवा'
ते पुढे म्हणाले की, "बोलण्याच्या ओघात माझ्याकडून चुकून राष्ट्रपतींचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख झाला. एकदा चूक झाली तर मी आता काय करू? यावरुन मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण याप्रकरणात आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ओढू नका. त्यांचा यात काहीही संबंध नाही,'' अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी दिली.