कमलेश वानखेडे, नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीचे दोन टप्पे आटोपले असताना युवक काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. निष्क्रियतेचा ठपका ठेवत युवक काँग्रेसच्या ४९ पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांनी आता युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. नागपूर व रामटेक लोकसभेत निष्क्रिय राहिलेले कुणाल राऊत यांना आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु यांच्याकडे केली आहे.
युवक काँग्रेसच्या ज्या ४९ पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला त्यातील अनेकजण जन्मताच काँग्रेसमध्ये राहिले आहेत. काहींनी आपल्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची सुरुवात काँग्रेसपासून केली आहे. मात्र भेदभाव करत राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याची पदाधिकाऱ्यांची भावना झाली आहे. जो नियम इतरांना तो प्रदेश अध्यक्षांना का नाही, संघटनेत विधानसभा अध्यक्षांपासून ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्वांना समान नियम असून त्यांनी देखील या संदर्भात कुठलेच काम केले नसताना त्यांच्यावर कुठलीच कारवाई का नाही, असा सवाल करीत या पदाधिकाऱ्यांनी आता स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. संबंधित नोटीस बजावून पदाधिकाऱ्यांनी पक्ष विरोधी काम केले असे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमची प्रतिमा मलिन करण्याचा डाव रचण्यात आला, याची दखल घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निवडणूक काळात विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. नोटीस बजावण्यापूर्वी कामाचा अहवाल मागायचा असतो. त्याने समाधान न झाल्यास कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची संघटनेची पद्धत आहे. मात्र या ठिकाणी राजकीय आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नोटीस काढणाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्हि. श्रीनिवास आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावरु यांच्याकडे केली आहे.
उमेदवारांकडूनच घेतले काम केल्याचे पत्र
लोकसभा निवडणुकीत अमुक पदाधिकाऱ्याने पक्षाचे काम केले आहे, याची हमी देणारे पत्र संबंधित पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांकडूनच घेतले आहे. आ. विकास ठाकरे, श्यामकुमार बर्वे यांच्यासह विदर्भातील उमेदवारांनी संबंधित पत्र दिले आहेत. हे सर्व पत्र युवक काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्षांकडे पाठविणार आहेत.
प्रदेश प्रभारींकडून सारवासारव
पदाधिकाऱ्यांकडून संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत उत्तम काम केले आहे. कुणीही पक्षाच्या विरोधात काम केले नाही, असे पत्र काढत प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानु यांनी आता या प्रकरणावर सावरासावर केली आहे.