नागपूर : शहर काँग्रेच्या प्रदेश प्रतिनिधींच्या यादीवरून वाद उफाळला आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या समर्थकांना या यादीत स्थान मिळालेले नाही, असा आक्षेप घेत राऊत-चतुर्वेदी समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी दिल्लीवारीची तयारी सुरू केली आहे.
नागपूर शहरातील १८ ब्लॉकमधून १८ प्रदेश प्रतिनिधींची यादी पाठविण्यात आली आहे. या यादीत अ.भा. काँग्रेस समितीचे महासिचव मुकुल वासनिक, महासचिव अविनाश पांडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अनीस अहमद यांची नावे आहेत. मात्र, माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांचे नाव नाही. चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक असलेले व पूर्व नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांचे नाव मात्र आहे. माजी पालकमंत्री नितीन राऊत यांचे नाव यादीत आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांची नावे नाहीत. त्यामुळे राऊत-चतुर्वेदी समर्थक दुखावले आहेत. प्राप्त माहितीनुसार महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, संजय दुबे, आर.एम. खान नायडू, हैदरअली दोसानी, सेवादलाचे कृष्णकुमार पांडे, माजी आ. एस.क्यू. जमा, कमलेश समर्थ, जिया पटेल आदींनी दिल्ली वारी आखली आहे. पक्षाचे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांची भेट घेऊन कुठल्याही निवडणुकीशिवाय प्रदेश प्रतिनिधी नेमण्यात आले असल्याची तक्रार केली जाणार असून संबंधित यादीला मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली जाणार आहे.
मुत्तेमवार पीता-पुत्र म्हणजे एका घरातून दोन नावे दिली जातात. ज्यांना विविध सेलचे प्रदेशचे अध्यक्षपद दिले आहे, त्यांची नावे पाठविली जातात. मात्र, राजकीय द्वेषातून इतरांची नावे वगळण्यात आली, असा या नाराज गटाचा आरोप आहे.
प्रतापगढी, पटोलेविरोधातील भूमिका देशमुखांना नडली
माजी आ. आशिष देशमुख यांनी दक्षिण-पश्चिम नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. देशमुख वगळता नागपूर शहरातील विधानसभेच्या सर्व उमेदवारांची नावे प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आली आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांनी उमेदवारी दिली होती. त्यावेळी माजी आ. आशिष देशमुख यांनी प्रतापगएी यांच्या उमेदवारीला विरोध करीत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. यानंतर विधान परिषद निवडणुकीतील मतफुटीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली होती. या घटनाक्रमामुळेच देशमुख यांचा पत्ता कट करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.