नागपूर : भारत विकास परिषदेच्या परिषदेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या एका कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. एका वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटचा आधार घेत तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन यांनी ट्वीट केले. यानंतर गडकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा वृत्तसंस्थेने विपर्यास केल्याचा दावा केला.
देशाच्या विकासाचा हवाला देत असताना गडकरी यांनी गरिबांच्या कोणत्या समस्या दूर करायच्या आहेत यावर भाष्य केले. त्यातील भारत हा एक श्रीमंत देश असून तेथील लोक गरीब आहेत. बेरोजगारी, उपासमार, गरिबी, महागाई, अस्पृश्यता, भेदभाव या समस्या देशात आहेत, हे वाक्य उचलून वृत्तसंस्थेने ट्वीट केले. या ट्वीटला काँग्रेससह देशभरातील विरोधकांनी रिट्वीट करावे, असे आवाहन डेरेक-ओ-ब्रायन यांनी केले. त्यानंतर गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण देत वृत्तसंस्थेचे ट्वीट विपर्यास असल्याचा दावा केला.
आपल्या समाज आणि देशाच्या समस्यांबद्दल मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. काही घटक व विरोधक त्यातून आनंद मिळवत आहेत. मी दिलेल्या संदर्भांमागील खरा हेतू नागरिकांनी समजून घ्यावा. जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेतील अडथळे असलेल्या सामाजिक समस्यांचा विचार केला पाहिजे. जलद गतीने प्रगती करण्यासाठी या सामाजिक समस्यांवर मात केली पाहिजे आणि त्यात काहीही गैर नाही. माझ्या संपूर्ण भाषणात हीच भूमिका होती, या शब्दांत गडकरी यांनी आपली भूमिका मांडली.