युवक काँग्रेसच्या निवडणुकीत ट्विस्ट, तौसिफ बनले शहराध्यक्ष; वाद पोहोचला दिल्लीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 11:36 AM2022-03-10T11:36:22+5:302022-03-10T11:50:33+5:30
चार उमेदवारांना मिळालेल्या मतांवरील बंदी हटविण्यात आल्याने सध्याचे अध्यक्ष तौसिफ खान यांना पुन्हा शहराध्यक्ष बनवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ट्विस्ट आले आहे. चार उमेदवारांना मिळालेल्या मतांवरील बंदी हटविण्यात आल्याने सध्याचे अध्यक्ष तौसिफ खान यांना पुन्हा शहराध्यक्ष बनवण्यात आले आहे, तर दोन दिवसांपूर्वी शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वात पुढे असलेले शीलजरत्न कृष्णककुमार पांडे यांना आता सचिवपदावर समाधान मानावे लागू शकते. या घटनाक्रमामुळे संघटनेत असंतोष पसरला आहे. एक गट तौसिफच्या वयासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत दिल्लीत पोहोचला आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक मत घेणारा अध्यक्ष व त्याच्यानंतर मत घेणारे उपाध्यक्ष व महासचिवचे पद मिळते. तौसिफसोबत वसीम खान, रौनक चौधरी, अक्षय घाटोळे यांना मिळालेली मते युवक काँग्रेसने होल्डवर ठेवली हाेती. याचे कारण म्हणजे अधिक वय आणि त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे होते. सध्या युवक काँग्रेसने त्यांच्या मतावरील होल्ड (रोक) हटविले आहे. रोक हटताच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या गटाने तौसिफ यांना पुन्हा अध्यक्ष निवडण्यात आल्याची घोषणा केली आहे.
दुसरीकडे इतर गटांनी तौसिफच्या वयावर प्रश्न उपस्थित करीत निकालावर आक्षेप घेतला आहे. काही पदाधिकारी दिल्लीलाही पोहोचले आहेत. त्यांचा असा दावा आहे की, तौसिफचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ते निवडणूक लढू शकत नाही. पांडे समर्थकांचा दावा आहे की, सर्वाधिक मते घेणारे तीन उमेदवार निवडणुकीसाठी पात्र नाहीत.
होल्ड केलेल्या उमेदवारांवर तीन महिन्यांची बंदी
उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले वसीम खान व रौनक चौधरी, तर महासचिव अक्षय घाटोळे हे तीन महिन्यांपर्यंत आपला कार्यभार सांभाळू शकणार नाहीत. युवक काँग्रेसने त्यांच्यावरील गुन्हे लपविण्यासाठी त्यांना मिळालेली मते होल्डवर ठेवली होती. युवक काँग्रेसने आता त्यांची मते जाहीर करीत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
कुणाला किती मते मिळाली
उमेदवार - मिळालेली मते
तौसिफ खान - २५,९३५
अक्षय घाटोळे - ९०९८
शुमभ सांगोळे - २७२३
वसीम खान १२,८३६
शीलजरत्न पांडे - ६२०९
तेजस जिचकार - ५८०९
प्रतीक इंदूकर - ३१३४