जागोजागी ठेवले बांधकाम साहित्य : पायी चालणाऱ्यांनी चालायचे कसे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील फूटपाथवर कंत्राटदारांनी जागोजागी बांधकाम साहित्य ठेवले आहे तर कुठे कचरा साचून असल्याने फूटपाथ कंत्राटदारांच्या सुविधेसाठी की चालणाऱ्यांसाठी असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
रामदासपेठ, व्हीआयपी मार्गाजवळील कृषी विभागाच्या वसतिगृहाजवळ मागील सहा महिन्यापासून फूटपाथवर एक महिन्यापासून गिट्टीचा ढीग व मलबा आहे. सिमेंट रोडच्या बाजुला गट्टू लावण्याचे काम पूर्ण केलेले नाही. महिनाभारापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. परंतु साहित्य तसेच पडून आहे. तसेच वसतिगृहाजवळील चौकातही गिट्टी फूटपाथवर ठेवण्यात आलेली आहे.
बर्डी ते अंबाझरी रस्त्यावर फूटपाथवार जागोजागी कचऱ्याचे ढीग साचून आहे. मेट्रो स्टेशन लगत मागील काही महिन्यापूर्वी रस्त्यालगत खोदकाम करण्यात आले. मलबा तसाच पडून आहे. अजनी रेल्वे स्टेशन ते धंतोली मार्गावर जागोजागी मलबा व कचरा आहे. नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट रोड लगतच्या फूटपाथवर अशीच परिस्थिती आहे.
..
जागोजागी अतिक्रमण
शहरातील फूटपाथदवरील अतिक्रमणाची समस्या कायम आहे. यासाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील अनधिकृत मंदिरांचे बांधकाम हटविण्यात आले. यासाठी मोहीम राबविण्यात आलीे. त्याच धर्तीवर शहरातील प्रमख मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे.
....
चालण्यासाठी सोयीचे फूटपाथ हवे
रहिवासी भागात, बाजारपेठेत, शाळा-महाविद्यालय, मॉल, सिनेमागृह, बसस्टॉप, रेल्वेस्थानक या भागात अशा प्रकारचे पदपथ असावे. त्यासोबत झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल असावे, लहान मुलांना, वयोवृद्ध, अपंगांना पदपथावरून सहज चालता यावे म्हणून पदपथाची उंची आणि रुंदी निश्चित करण्यात आली आहे. आयआरसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पदपथावर गार्ड रेल असावे जेणेकरून पदपथावरून थेट रस्त्यावर मुले, अपंग येऊ नये. परंतु याची दखल घेतली जात नाही.
.........
मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे
पदपथावर झाडे, मेनहोल, विद्युत खांब अशा कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये. पदपथाची उंची १५० मि.मी.पेक्षा अधिक नसावी. १८०० मि.मी. रुंदी असावी. दुकाने किंवा बसस्टॉप आणि झाडे असल्यास १५०० मि.मी. असू शकेल. या सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही.