पाणी टाकताच लागला करंट : झिंगाबाई टाकळीतील हृदयद्रावक घटना नागपूर : सुरू असलेल्या कूलरमध्ये पाणी टाकताना एकापाठोपाठ विवाहित मुलगी, आई आणि वडील या तिघांचा करुण अंत झाला. झिंगाबाई टाकळीतील झेंडा चौकाजवळील रजत अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी ही सुन्न करणारी घटना घडली. यामुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.विनिशा कमलेश काळे (वय ३३), अंजली किशोर दामले (वय ५५) आणि किशोर दामले (वय ६१) अशी मृतांची नावे आहेत. एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) म्हणून पोलीस दलातून निवृत्त झालेले किशोर दामले मानकापूरच्या रजत अपार्टमेंटमध्ये राहतात. विनिशाचे लग्न २०१३ मध्ये झाले असून, तिचे पती बँकेत कार्यरत आहेत. ती याच अपार्टमेंटच्या वरच्या माळ्यावर राहते. पती कर्तव्यावर गेल्यानंतर घरचे कामकाज आटोपून ती दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास आपल्या चिमुकल्याला घेऊन वडिलांच्या घरी आली. गप्पागोष्टी करीत असताना कूलरचा खडखडाट ऐकून तिचे कूलरकडे लक्ष गेले. कूलरमध्ये पाणी नसल्याचे लक्षात आल्याने विनिशाने घरात जाऊन सुरू असलेल्या कूलरमध्ये पाणी टाकले. त्याचवेळी तिला जोरदार करंट लागला. तिची किंकाळी ऐकून आई अंजली आणि वडील किशोर विनिशाला वाचविण्यासाठी धावले. घाईगडबडीत त्यांनी कूलरचा प्लग काढण्याचे किंवा बटन बंद करण्याचे टाळले. त्यामुळे विनिशासोबत या दोघांनाही कूलरचा जोरदार करंट लागला. हे तिघेही कोसळले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी तिघांनाही मेयोत नेले. येथील डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.
कूलरने घेतला तिघांचा जीव
By admin | Published: June 03, 2016 2:49 AM