लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर काम करणाऱ्या कुलींना अता दररोज हजेरी लावावी लागणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने आता कुलींचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.हजेरी लावण्याचा नियम रेल्वेने यापूर्वीही अमलात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी कुलींनी त्यास विरोध दर्शविला होता. परंतु आता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. त्यांनी कुलींची बैठक बोलावून हजेरी देण्याचे महत्त्व सांगितले; सोबतच रेकॉर्ड ठेवल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याचा विश्वास दिला. त्यानंतर कुलींनी हजेरी लावण्यास संमती दिली. नागपूर रेल्वेस्थानकावर १५५ कुली काम करतात. परंतु ट्रॉली बॅगमुळे कुलींचे काम कमी झाले आहे. कुली दोन पाळीत काम करीत आहेत. रेल्वेच्या वतीने कुलींना कोणत्याच प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाहीत. त्यामुळे काम न मिळाल्यामुळे कुली काही महिन्यांसाठी शेती करण्यासाठी जातात. रेल्वेकडे कुलींचे रेकॉर्ड राहिल्यामुळे त्यांना भविष्यात काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.महिला कुली रुणालीचा सन्माननागपूर रेल्वेस्थानकावर कार्यरत महिला कुली रुणाली राजकुमार राऊत (बिल्ला क्रमांक १६९) हिला मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनातर्फे सन्मानित करण्यात आले. रुणाली राऊतने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी सन्मानपत्र देऊन तिचा सन्मान केला.