काटोल : काटोल व नरखेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन माजी गृहमंत्री आणि आ. अनिल देशमुख यांनी केले. काटोल पंचायत समितीच्या सभागृहात कोविड आढावा बैठक देशमुख आणि जिल्हाधिकरी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. तीत उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी काटोल तालुक्यातील कोरोना संक्रमण परिस्थिती आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी अवगत केले. तालुक्यात लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात यावी. प्रशासनाने बाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना देशमुख यांनी केल्या. काटोल तालुक्यात मार्च २०२० ते १९ एप्रिल २०२१ पर्यंत ६९८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील २१९३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या काटोल येथील कोविड केअर सेंटरमध्ये ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच २१३५ संक्रमित गृहविलगीकरणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली ठाकूर, काटोल पंचायत समितीचे उपसभापती अनुराधा खराडे, माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबा शेळके, जि.प. सदस्य चंद्रशेखर कोल्हे, समीर उमप, चंद्रशेखर चिखले, संदीप वंजारी, पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, प्रभारी तहसीलदार नीलेश कदम, बीडीओ संजय पाटील आदी उपस्थित होते.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:08 AM