मुंबई : गोसी खुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्यीय यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी दिले.
गतवर्षी आलेल्या गोसी खुर्द प्रकल्पातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी करण्यात येणाऱ्या पूरनियंत्रण कार्यक्रमाबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, खासदार प्रफुल्ल पटेल, खा. कृपाल तुमाने, खा. सुनील मेंडे उपस्थित होते.
गतवर्षीसारखी पूरपरिस्थिती यावर्षी निर्माण होऊ नये, याकरिता जलसंपदा विभाग तसेच महसूल यंत्रणेने समन्वय साधावा. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर असलेले पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न संबंधित जिल्हाधिकारी यांनी आमदार महोदयांशी चर्चा करून ते सोडविण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, तसेच या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत २२ जून रोजी मुंबई येथे सविस्तर बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीस जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव (प्रकल्प समन्वयक) तथा कृष्णा खोरे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विदर्भासाठी ४० बोटी- वडेट्टीवार
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण शासन तयार करीत आहे. लवकरच ते पूर्ण होऊन त्याचा लाभ संबंधिताना होईल. गोसी खुर्द प्रकल्पातील असलेले पुनर्वसनाचे प्रश्न पुढील काही काळामध्ये मार्गी काढण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विभागाने ११६ नवीन मोठ्या बोटी खरेदी करण्याचे ठरविले असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. त्यातून ४० बोटी विदर्भासाठी देण्यात येणार आहेत.
लोकप्रतिनिधींच्या सूचना
- खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा शहरासाठी असलेल्या पूरनियंत्रण भिंतीबाबतचे प्रश्न, तेथील पुनर्वसनाचे प्रश्न यात येणाऱ्या अडीअडचणी तातडीने सोडविण्याविषयी सूचना केली. याबाबतचे नियोजन करून हे प्रश्न सोडविल्यास संभाव्य धोका टळू शकेल, असे सांगितले. खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंढे यांनीही मागच्या वेळी झालेले नुकसान पाहता तत्काळ पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागावे, अशी सूचना केली.
- काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले, ॲड.आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, ॲड. अभिजित वंजारी यांनीही संबंधित भागातील पुनर्वसन, नुकसान भरपाई, संभाव्य नियोजन, अडीअडचणी याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.