ऑनलाईन लोकमत
नागपूर : कॉपरच्या बांगड्यांवर सोन्याचा मुलामा चढवून त्या सोन्याच्या बांगड्या आहेत असे सांगत दोघांनी एका व्यक्तीकडून १० हजार रुपये हडपले. स्वातंत्र्य दिनाला दुपारी १२.१५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली. बाळासाहेब बाबूराव दोडे (वय ५६) असे फिर्यादीचे नाव आहे. ते साईनगर हिंगणा येथे राहतात. आरोपी राजू गंगाधर बांगरे (वय ५६) आणि त्याचा एक साथीदार गुरुवारी दुपारी दोडे यांच्याकडे आले. आपल्याकडे सोन्याच्या बांगड्या आहेत. महत्त्वाचे काम असल्याने कमी किंमतीत बांगड्या अर्जंट विकायच्या आहेत, असे सांगून सोन्याच्या बांगड्यांसारख्या दिसणाऱ्या दोन बांगड्या दोडे यांना दिल्या. त्याबदल्यात आरोपी बांगरे आणि त्याच्या साथीदाराने दोडे यांच्याकडून १० हजार रुपये घेतले. काही वेळेनंतर दोडे यांनी सराफाकडून बांगड्या तपासून घेतल्या असता, त्या सोन्याच्या नव्हे तर कॉपरच्या असल्याचे आणि त्यावर सोन्याचे पॉलिश असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्यामुळे दोडे यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.