लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांना सोमवारी रस्टीकेट करण्यात आले आहे. भरारी पथकाने ही कारवाई करून पुढील प्रक्रियेकरिता हे प्रकरण विभागीय कार्यालयाकडे पाठवले.मंडळ अधिकाऱ्यांनुसार, इंग्रजी पेपरकरिता भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली होती. त्यांना संवेदनशील केंद्रांवर अधिक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पेपर सुरू होताच भरारी पथके सक्रिय झाली. त्यांनी नकल करताना पकडलेले बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. इयत्ता दहावीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू झाली. यापूर्वी ५ ते १० प्रकरणेच पुढे आली होती. कॉपी वगळता पेपर सुरळीत पार पडला. काही परीक्षा केंद्रांवरील माहिती मंडळाला प्राप्त झाली नाही. त्यामुळे तेथे काय झाले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये ७ मार्चपर्यंत एकूण १४० विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले.
नागपुरात दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये कॉपी : नऊ विद्यार्थी रस्टीकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 8:31 PM