चंद्रशेखर बावनकुळे : संस्थानच्या जागेवर समाजोपयोगी प्रकल्प उभारणार कोराडी : श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत आहे. विकास आराखड्यानुसार शासनाकडून मिळत असलेला निधी आणि विकासकामांचा वेग विचारात घेता हे विदर्भातील सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत आहे. शिवाय, या मंदिराच्या परिसरात संस्थानच्या आठ एकर जागेवर अपंग पुनर्वसन केंद्र, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मतिमंदांना आधार केंद्र मेडिटेशन सेंटर हे पाच समाजोपयोगी प्रकल्प लवकरच उभे राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कोराडी येथे पर्यटन विभागामार्फत १४४ गाळे असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या पायाभरणी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक भेसकर, महादुल्याच्या नगराध्यक्ष सीमा जयस्वाल, उपाध्यक्ष राजेश रंगारी, पंचायत समिती सदस्य केशर बेलेकर, राम तोडवाल, उपसरपंच अर्चना दिवाणे, केशवराव फुलझेले, दयाराम तडस्कर, नारायण जामदार, दत्तू समरीतकर, भिवगडे, मुख्य अभियंता अनिल देवतारे, प्रभाकर निखारे उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, तलावाकाठच्या मार्गाचे सपाटीकरण केले जाईल. येथे सी प्लेन उतरण्याची सुविधा केली जाणार असून, मोठी वीज वाहिनी स्थानांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षेसाठी कालव्यावर स्लॅब टाकण्यात येणार असून, मोकळी जागा उपलब्ध केली जाईल. शासनाने या पर्यटनस्थळाला १८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नियोजित विकासकामे दोन वर्षांत पूर्ण केली जाईल. या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरपंच अर्चना मैंद यांनी प्रास्ताविक केले. संचालन उत्तम झेलगोंदे यांनी केले. (वार्ताहर)
कोराडी सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ होणार
By admin | Published: March 29, 2017 2:54 AM