जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरबेलगाम झालेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांचे मिशन ‘मोक्का’ सुरु आहे. इकडे मात्र उपराजधानीचे वैभव असलेल्या राजभवनाच्या सुरक्षेला सुरुंग लागला आहे. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपालांचे शासकीय निवासस्थान असलेले राजभवन गुन्हेगारांच्या रडारवर आहे. येथील तटबंदी भेदून हैदोस घालण्याच्या घटनात गत दीड वर्षांत वाढ झाली आहे.असे असताना राजभवन प्रशासनाकडून तक्रार केल्यानंतरही चोरीच्या एका प्रकरणात मात्र प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात नागपूर पोलिसांना चार महिन्यांचा कालावधी लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे उपराजधानीतील संवेदनशील स्थळ खरच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. नागपुरातील राजभवनाची रचना पाहता येथे प्रवेश करणे कठीण आहे. सुरक्षेची तटबंदी मजबूत करण्यासाठी येथे १२ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. असे असतानाही गुन्हेगारांनी मात्र येथील सुरक्षा व्यवस्था भेदत गत दोन महिन्यात चार वेळा प्रवेश केला आहे. राजभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नागपूर शहर पोलिसांकडे आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी राजभवनाच्या प्रवेशद्वारावर २४ पोलीस कर्मचारी विविध पाळ्यात तैनात असतात. मात्र त्याचांकडे सुरक्षाविषयक तपासणींसाठी साधने अपुरी आहेत. राजभवनाची सुरक्षा व्यवस्था चौकस करण्यासाठी गत दहा वर्षांत दोनवेळा सुरक्षा आॅडिट झाले. मात्र या आॅडिटच्या शिफारशी किती अमलात आल्या, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
राजभवनाच्या सुरक्षेला सुरुंग
By admin | Published: February 17, 2016 2:58 AM