सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या उद्रेकात जीव ओतून रुग्णसेवा देत असताना मेयो, मेडिकलवर मूत्रपिंड काढण्यासारखे खोटे आरोप होत आहे. धमकीवजा भाषेचा वापर केला जात आहे. काही दिवसापूर्वी तर मेयोवर १०० ते १५० लोकांचा समूह चालून आला होता. असे असतानाही या दोन्ही रुग्णालयात रुग्णसेवेत खंड पडला नाही. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा कोविड तपासणीचा अहवाल येण्याची वाट न पाहता, त्याला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. अशा रुग्णांकडून व कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने मेयो, मेडिकलमधील तब्बल ६७ डॉक्टरांना व ३३ परिचारिकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ नागपूर जिल्ह्यातीलच रुग्ण येत नाही तर विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येत आहेत. या दोन्ही रुग्णालयाने मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ६०० खाटांची सोय केली आहे. यातच गेल्या महिन्यापासून ‘नॉनकोविड’ रुग्णांची संख्या वाढल्याने डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका मेयो, मेडिकलचा कणा समजल्या जाणाऱ्या निवासी व इंटर्न डॉक्टरांना बसत आहे. कोविड वॉर्डात किंवा ओपीडीमध्ये सेवा देत आहे. सुटी न घेता आपले कर्तव्य बजावत आहे.
मेडिकलमध्ये ३६ डॉक्टर पॉझिटिव्हमेडिकलमध्ये या आठवड्यात एका वरिष्ठ डॉक्टरासह ३५ निवासी व इंटर्न डॉक्टर आणि २६ परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर व कोविड तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर पुन्हा ते रुग्णसेवेत असणार आहेत.
प्रशासनाला हवे सहकार्यकोरोनाविरोधातील लढ्यात डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी प्राणपणाने लढत आहेत. प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सेवा देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहेत. सुटी न घेता प्रत्येकजण सेवा देत आहे. अशावेळी डॉक्टरांविरुद्ध रोष योग्य नाही. प्रत्येकांनी रुग्णालय प्रशासनाला सहकार्य करायला हवे.
मेयोमध्ये ३१ डॉक्टर उपचाराखालीमेयोमध्ये या आठवड्यात ३१ डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. यात तीन वरिष्ठ डॉक्टर, २८ निवासी व इंटर्न डॉक्टर आणि सात परिचारिका आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह आलेले १०० वर आरोग्यसेवक उपचारानंतर पुन्हा कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत आहेत.