लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षात उपराजधानीतील नागरिकांमध्ये पासपोर्ट काढण्यासंदर्भात जागरूकता वाढत असल्याचे दिसून आले. मात्र या वर्षी ‘कोरोना’च्या प्रकोपाचा फटका पासपोर्ट कार्यालयालादेखील बसला आहे. मागील दोन वर्षात प्रति महिना पासपोर्टसाठी ९ हजार ८०० हून अधिक अर्ज येत होते. मात्र या वर्षी हा आकडा घटून पाच हजारांच्या जवळपास आला आहे. याशिवाय महसुलातदेखील मोठी घट झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर येथील ‘पासपोर्ट’ कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. २०१८ ते जून २०२० या कालावधीत ‘पासपोर्ट’साठी आलेले अर्ज, प्रत्यक्ष जारी करण्यात आलेले ‘पासपोर्ट’, शुल्कातून प्राप्त झालेला महसूल इत्यादींबाबत विचारणा केली होती. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार या अडीच वर्षांच्या कालावधीत २ लाख ७० हजार २९३ अर्ज आले. २०१८ साली १ लाख १७ हजार ७९१, २०१९ साली १ लाख २२ हजार ३९३ तर या वर्षी जूनपर्यंत केवळ ३० हजार १०९ अर्ज प्राप्त झाले. या तीन वर्षांतील व अगोदरचे प्रलंबित अर्ज असे मिळून या काळात २ लाख ५९ हजार २५५ ‘पासपोर्ट’ जारी करण्यात आले.महिन्याच्या महसुलात प्रचंड घट‘पासपोर्ट’ शुल्कातून २०१८ साली दर महिन्याला सरासरी दीड कोटीचा महसूल प्राप्त झाला. तर २०१९ मध्ये हाच आकडा १ कोटी ६० लाखांच्या वर होता. मात्र २०२० मध्ये ‘कोरोनाचा प्रचंड फटका बसला व दर महिन्याला केवळ ६९ लाखांच्या जवळपासच महसूल मिळू शकला. अडीच वर्षे मिळून ‘पासपोर्ट’ कार्यालयाला ४१ कोटी ६६ लाख ९१ हजार ४५० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
‘कोरोना’चा नागपुरातील ‘पासपोर्ट’ केंद्रालादेखील फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 8:56 PM