लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या दिवशी नागपूर जिल्ह्यात ८३० लसींचा वापर करण्यात आला. यातील ७७९ लसी लाभार्थ्यांना देण्यात आली. तर ५१ लसी ‘वेस्ट’ गेल्या. यात शहरातील पाच सेंटरमधून २० तर ग्रामीणमधील सात सेंटरमधून ३१ लसी वाया गेल्याचे सामोर आले आहे. कोरोना दहशतीत सलग १० महिने घालविल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली. जगभरात हाहाकार उडविणाऱ्या कोरोना संसर्गावर शनिवारपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत पहिल्याच दिवशी ६५.४८ टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील १२ केंद्रांना ११८५ लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यातील ७७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात शहरातील २७० तर ग्रामीणमधील ५०६ लाभार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, सर्वाधिक लसीकरण काटोल केंद्रावर तर सर्वात कमी लसीकरण मेयो रुग्णालयातील केंद्रावर झाले.
नागपूर जिल्ह्यात शनिवारी ६५.४८ टक्के लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील १२ केंद्रांना ११८५ लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यातील ७७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात शहरातील २७० तर ग्रामीणमधील ५०६ लाभार्थ्यांचा समावेश होता. उपलब्ध माहितीनुसार, शहरातील पाचपावली केंद्रात ६० लसींचा वापर झाला. यातील ५९ लसी लाभार्थ्यांना देण्यात आल्या तर १ लस वाया गेली. मेयो रुग्णालयाच्या केंद्रात ४० लसींमधून ३७ लसी देण्यात आल्या तर ३ वाया गेल्या. डागा केंद्रात ६० लसींमधून ५३ लसी देण्यात आल्या ७ वाया गेल्या. एम्स केंद्रात ७० लसीमधून ६८ लसी देण्यात आल्या तर २ वाया गेल्या. मेडिकल केंद्रात ६० लसींमधून ५३ लसी देण्यात आल्या तर ७ वाया गेल्या. विशेष म्हणजे, लसीकरणात १० टक्के लसी वाया जाणार असल्याचे गृहित धरूनच शासनाने लसी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
ग्रामीणमध्ये ५४० मधून ५०९ लसी दिल्या
नागपूर ग्रामीणमधील ७ केंद्रांवर ५४० लसींचा वापर झाला. यातील ५०९ लसी लाभार्थ्यांना दिल्या तर ३१ लसी वाया गेल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा केंद्रावर ८० लसींमधून ७६ लसी देण्यात आल्या ४ लसी वाया गेल्या. सावनेर केंद्रावर ७० लसींमधून ६८ लसी देण्यात आल्या, २ लसी वाया गेल्या. काटोल केंद्रावर ८० लसींमधून ७८ लसी देण्यात आल्या, २ लसी वाया गेल्या. रामटेक केंद्रावर ८० लसींमधून ७६ लसी देण्यात आल्या. ४ लसी वाया गेल्या. कामठी केंद्रावर ८० लसींमधून ७३ लसी देण्यात आल्या. ७ लसी वाया गेल्या. उमरेड केंद्रावर ७० लसींमधून ६२ लसी देण्यात आल्या, ८ लसी वाया गेल्या तर गौंडखैरी केंद्रावर ८० लसींमधून ७६ लसी देण्यात आल्या तर ४ लसी वाया गेल्या.
चार तासांत २० लाभार्थ्यांना लस देणे आवश्यक
मेडिकलच्या लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. कोव्हॅक्सिनच्या एका व्हायलमध्ये २० डोस असतात. परंतु व्हायल उघडल्यानंतर चार तासांतच हे डोस देणे आवश्यक असते. या दरम्यान लाभार्थी उपलब्ध नसल्यास लस वाया जाते. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ७ लसी वाया गेल्या.
-डॉ. उदय नारलावार
प्रमुख, पीएसएम विभाग