नागपूर : बुधवारचा दिवस कोरोनाबाबत जिल्ह्याला धक्का देणारा ठरला. जिल्ह्यात चौदाशेहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळून आले. एकीकडे चाचण्यांची संख्या साडेबारा हजारांहून अधिक गेली असताना दुसरीकडे सक्रिय रुग्णसंख्येने देखील साडेपाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सातत्याने कोरोनाबाधित वाढत असताना जनतेने जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
बुधवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण १ हजार ४६१ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यातील २३६ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ हजार १५७ रुग्ण शहरातील असून ६८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. बुधवारी चाचण्यांचा आकडा वाढून १२ हजार ७२९ वर पोहोचला. त्यातील ९ हजार २२३ चाचण्या शहरात तर ३ हजार ५०६ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. बुधवारी कुठल्याही मृत्यूची नोंद झाली नाही व एकूण मृत्यू संख्येचा आकडा १० हजार १२४ इतका आहे.
बुधवारी जिल्ह्यात ४९७ कोरोनाबाधित ठीक झाले. त्यातील ३२८ शहरातील व १०२ ग्रामीणमधील आहेत.
कोरोनबाधितांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा पाच लाखांच्या वर पोहोचला आहेत. जिल्ह्यात एकूण ५ लाख ८१९ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील ३ लाख ४६ हजार ४१४ रुग्ण शहरातील, १ लाख ४७ हजार १५६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
सक्रिय बाधित वाढीस
जिल्ह्यातील सक्रिय बाधितांचा आकडा ५ हजार ६८८ वर पोहोचला आहे. त्यातील ४ हजार ८७६ रुग्ण शहरातील व ७७५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. बुधवारी शहरातील ३२८ रुग्णांसह एकूण ४९७ रुग्ण बरे झाले.